Tuesday, April 27, 2010

आजचा दिवस




कसा होता आजचा दिवस ?
कुणीच नाही विचारला जर का ,
मी तरी नेहमीच विचारते स्वत:ला
हा प्रश्न ,
न विसरता ..
जेंव्हा विसावते जराशी,
गॅलरीत बसून बघताना
मावळता सूर्य !

Monday, April 19, 2010

`handy ' subject


A type of a `self portrait ' !
My left hand is a silent observer of all my paintings .
It does have to do some assistance
like balancing ,holding the paper
or a colour bottle .
Here it is the subject !!
The right hand has no right to become
the subject !!!

Friday, April 16, 2010

चित्र पहावे काढून ..



चित्र काढण्यात केवढा आनंद आहे !
पण चित्राला सुरुवात करणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे .
एकतर चित्र खुणावत असताना आपण नेमके दुसर्‍या कामात असतो .

तैल रंगात काम करणं हे आणखी कष्टाचं .
मी कधीतरीच त्या वाटेला गेलोय .
माझ्या मुलीचं,रुपालीचं हे चित्र
असंच खूप दिवसांनी केलेलं चित्र आहे .
अर्थात चित्रातल्या रंगांप्रमाणे
हिरवाई निर्माण झाली
या चित्रामुळे
वातावरणात!

Friday, April 9, 2010

distortion



I had no other way to express my feelings about alcoholism . I have distorted every figure .Rather tried my best to disfigure it .The physical and mental structure of human being deteriorates due to this poison .

Thursday, April 8, 2010

झाड म्हणजे ..



झाड म्हणजे गोष्ट असते हिरवीगार, छान छान
‘बी’ने सांगितलेली !
एकेका ‘बी’ची एकेक गोष्ट .
गोष्ट इथे .
गोष्ट तिथे ...
गोष्टींचंच मग उगवतं रान .
मग कुणाला कसलं भान ?

आई




घेऊन तुला मी जवळी
मी माझ्याशी बोलते
श्वासात तुझ्या ऐकते
अन तेजाची मी गीते

Tuesday, April 6, 2010

एकांती



कधी एकांती नाचे मी
तर कधी वाचे मग मलाच मी
मिटुनी डोळे आनंदाने
मलाच घेई कवेत मी !

कविता कधी होऊन बसे मी
चित्रच वा होऊन हसे मी !
स्वप्न उद्याचे अंतरात तरी
काळाच्या पोटात घुसे मी !

सावली हेच सर्वस्व !




खूप उजेडात दिसत नाही काहीच
आणि फसायला मात्र होतं ..
जसं खूप अंधारातही होतं..

चित्रातला उजेड रेषेला सापडतोच असं नाही
उलट
उजेडात रेषा दिसायची बंदच होते !

जिथे रेषा नाही
तिथेच सुरू होतं ,
मनाचं राज्य !!

सावलीचा आधार घेत घेत
गवसतं एकेक चित्र ...

Friday, April 2, 2010

कमळ





मी लहानपणी कमळाचं चित्र काढत असे .
कमळाचं फूल मात्र मी तेंव्हा बघितलेलंच नव्हतं .
मला खूप वाटायचं बघावसं .. . .
त्याला कारणं खूपच होती .

चित्रातली गोष्ट खरंच कशी आहे ही उत्सुकता .
मी काढतो ते चित्र बरोबर आहे हे तेंव्हाच कळणार होतं .
क , क, कमळातला ही तर सुरुवातच होती शाळेची .
आपल्या देशाचं ‘राष्ट्रीय फूल ’ आहे ते .
आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ,
माझ्या आईचं नाव आहे ‘कमल ’ !
(लंपनला जसं दुर्गा रागाविषयी वाटायचं तसंच असावं ते .)

कोकणात आल्यावर खूप प्रकारची फुलं बघता आली .
खरी ,खरी !
खोटी वाटतील अशीही ,पण खरी !

कमळाचं सरळ वर येणं ,
उमलणं म्हणजे काय हे जणू
सर्वांना समजावून सांगणं ,
पाण्यात पाय बुड्वून उभं राहणं ..
अतिशय वेगळं आहे सगळं !

तो चेहेरा , त्या रेषा ...





आक्का नाही आता .
कधी कधी सहजच काढलेली तिची चित्रं माझ्याजवळ आहेत .
त्या चित्रांकडे मी पुन्हा पुन्हा बघतो .आक्काशी बोलल्यासारखं वाटतं .
कागद ,रेषा ,चित्रं ..एक आठवण ..एवढंच !
माणूस असतो म्हणजे काय ?
... आणि नसतो म्हणजे काय ????

शेवटच्या काही वर्षात मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांना
नवं भिंग बसवूनही
आक्काला स्पष्ट दिसत नव्हतं सगळं .
प्रयत्‍न करून करून
ती बघायची मात्र .

मी सुध्दा
आता किती आठवून बघतो
तो चेहेरा ,त्या रेषा ..
माझ्या स्मृतीचं भिंग
मोतीबिंदू झाल्यासारखं ...

Thursday, April 1, 2010

पुन्हा..




आज आभाळात पुन्हा
नाही ढग एवढासा ,
माती व्याकुळली मनी
पुन्हा कोरडा उसासा ...

Followers