Monday, October 11, 2010
भावनाचित्र
मनातल्या भावना कागदावर उतरतात तरी कशा?
चित्रं रेषा आणि रंगांनी सजत असली तरी,
सगळ्या हळुवार छ्टा त्यांना कुठून मिळत असतील?
आणि बघणाराही त्याच भावनेत गुंतून जावा इतकी
प्रचंड शक्ती त्यांना कोण देतं?
राग, लोभ, दुरावा, जवळीक,
आनंद, दु:ख ..
भावनांना रूप देणं इतकं सोपं असतं?
Sunday, October 10, 2010
Not to colour is a `bright' idea!
समुद्रावर संध्याकाळी
Monday, September 27, 2010
माळावर संध्याकाळी...
Friday, September 17, 2010
Mother's hand
Friday, September 3, 2010
waiting room
Tuesday, July 27, 2010
चेहरे आणि भास
Saturday, July 17, 2010
राग .. गाण्यातला
तंबोरा छेडल्यावर होणारी जादू
आपल्याला आता नवीन नाही .
तरूने ती जादू त्या दिवशी पहिल्यांदाच अनुभवली .
त्याला वाटलेलं आश्चर्य त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं .
दोन तीन वेळा तारा छेड्ताच त्याला मोठी गंमत वाटली .
आता त्याला तारा छेडायच्या होत्या !
आणि तो सरसावून तिथं तंबोर्याशेजारी उभा राहिलाच .
त्याने स्वत:च्या बोटांनी तारांना स्पर्ष केला ..
आणि स्वर झंकारले .
खूप वेळ हवेत थरथर होती .
तरू माझ्याकडे बघून हसत होता .
आता तर तरू त्या सुरांबरोबर गातो ..
‘आ sssss '
Monday, July 12, 2010
राग ..पण गाण्यातला नाही !
Sunday, July 4, 2010
प्रवासातली चित्रं
Friday, July 2, 2010
पक्षी जाय दिगंतरा ...
Tuesday, June 22, 2010
अंघोळ म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे अंघोळ !
पाणी दिसताच तरुला कधी एकदा
तिथे पोहोचतोय असं होतं .
अंघोळ हा अगदी आवडीचा प्रकार .
पाण्याशी खेळत बसणं ,
बदकाला ,बॉलला अंघोळ घालत बसणं ,
त्याला अतिशय आवडतं .
पाणी उडवायला ,
पाण्याची धार बघत रहायला
त्याला वेळ पुरत नाही .
यंदा पहिल्यांदाच
पाऊस बघतोय तरू .
किती मन लावून बघतोय .
खिडकीवर हनुवटी टेकवून
बघतच बसतो .
एकटक ..
काय वाटत असेल त्याला ?
एवढं पाणी !
कोण ओततंय वरनं ?
सहज जाता जाता ..
शांतपणे चित्र काढत बसताच येत नाही .
वेळ मिळताच एखादं रेखाचित्र काढतोय .
रंगांमध्ये डुंबायचं राहून गेलंय कधीचं .
......................
रेषेबरोबरचा प्रवास सुंदरच आहे .
रेषा बघता बघता नवं गाव वसवते .
रेषा खेळत असते आट्या पाट्या ..
प्रत्येक वेळी लोण पोहचतंच असं नाही .
एक रेषा चुकली तरी
बाद होतो मी .
पुन्हा राज्य घेतो मी !
Wednesday, June 16, 2010
कब्बू
माणसांच्या गर्दीतही स्वत:चा एकांत टिकवून ,
मिळालेल्या इवल्याशा अवकाशात बिनतक्रार राहणारा ,
अतिशय सुंदर पक्षी , कबूतर !
शांतीदूत !
खरंच ,
मनाच्या शांततेला कबूतरांच्या हालचालींमुळे बाधा तर येत नाहीच,
उलट त्यांच्या त्या गिरक्यांनी सुंदर सजावट केली जाते .
तरूची नजर सारखी फिरत असते कबुतरांबरोबर .
न्याहाळत असतो त्यांना तो .
मन भरून .
त्यांच्या हवेतल्या झेपा ,बसणं ,उठणं ,मान वळवून बघणं ...
किती आनंदाने बघतो तरू !
कब्बू , कावू ,चिऊ..सगळी करमणूकच !!
विश्वनिरिक्षणाची सुरूवात करून देणारे हे क्षण ..
नाविन्याचे ,आश्चर्याचे ,आनंदाचे !
कदाचित नंतर विसरायला होतील .
आणि म्हणूनच लिहायला हवेत .
हवेत विरण्याआधीच जपायला हवेत !!
Monday, June 14, 2010
भुर्रर्र ss
तरूच्या गोष्टी सांगताना एकेक गंमत आठवते .
त्या गंमतीबरोबरच तरू डोळ्यापुढे दिसायला लागतो .
मोटरसायकलवर स्वार झाल्याप्रमाणे तो हात पुढे घेवून ‘भुर्र’ करतो .
तो आवाज तसाच सुरू ठेवून एक वेगळंच वातावरण तयार करतो तो !
नाटक करतो तो !!
अजून नीट उभंही राहता येत नसताना
त्याची ही कल्पना भारीच वाटून जाते .
कबुतरांना उडताना बघून
तो सुद्धा हात हलवून उडण्याचा प्रयत्न करतो ,
तेंव्हा खूपच करमणूक होते खरी .
काय सांगावं ,तसा शोध लागेलही काही काळात !
Saturday, June 12, 2010
विचारवंत तरू
तरूचे कान महात्मा गांधीजींच्या कानांसारखे दिसतात .
टवकारल्यासारखे ते आहेतच आणि थोडे मोठे देखील आहेत .
पालथी मांडी घालून तो बसतो खूपदा .
मग मात्र पाठमोरा तरू सभेसमोर व्यासपीठावर बसलेल्या
महात्माजींची आठवण करून देतो .
हाताची घडी घालून ,
एक हात ओठांशी खेळवत
शांतपणे तो कसला एवढा विचार करतो ?
अशा वेळी मला त्याला विचलीत करावंसं नाही वाटत .
ती त्याची विचारमग्न स्थिती मला खूप आवडते .
रोज रोज असा विचार करूनच तो होईल ..
विचारवंत !
आंsssबा ss !
Tuesday, June 8, 2010
गप्पा मारणारं खेळणं
वर्तमानपत्राचे कागद आनंदात टरकावणं हा मुलांचा खेळ बघून
थोडंसं घाबरतोच आपण .
तरूचा तो उद्योग बघून आम्ही तसे बिथरलो होतो .
पण नंतरचं त्याचं पुस्तक-प्रेम हे एक मोठं नवलच आहे !
सहा महिन्यांचा असल्यापासून तो पुस्तकं ‘वाचतोय’!
हो ,खरंच .
आणि अगदी आपल्यापेक्षा जास्त एकाग्रतेने .
बोटांनी बंद पुस्तकाची पानं तो किती सहज चाळतो !
एक एक पान पलटत त्याची नजर छानच फिरते .
चित्रलिपीचा मोठा अभ्यासक वाटतो तो अशा वेळी .
त्याला खिळवून ठेवणारं पुस्तक ग्रेटच आहे !!
आवाज न करताही ‘गप्पा मारणारं ’खेळणं .
Monday, June 7, 2010
माssमाss
Sunday, June 6, 2010
बॉ ssss(ल )
बॉल या शब्दाचा
तरूसारखा नाssजुक उच्चार
आणखी कुणाला करता येईल
असं मला वाटत नाही .
फुलांचं वजन जसं जाणवतच नाही
फक्त गंध मोहीत करतो
तसं तरूचं बोलणं !
ऐकू येतं ,
मनावर अलगद मोरपीस फिरतं
पण
ध्वनीचा धक्का बसत नाही !!
आणखी एक गंमत म्हणजे
प्रत्येक लहान मोठ्या वर्तुळात
त्याला बॉलच दिसतो !
आणि त्या प्रत्येक वर्तुळाला
तो तेवढीच नाजुकशी हाक मारतो !!
Subscribe to:
Posts (Atom)