Thursday, April 8, 2010

आई




घेऊन तुला मी जवळी
मी माझ्याशी बोलते
श्वासात तुझ्या ऐकते
अन तेजाची मी गीते

Tuesday, April 6, 2010

एकांती



कधी एकांती नाचे मी
तर कधी वाचे मग मलाच मी
मिटुनी डोळे आनंदाने
मलाच घेई कवेत मी !

कविता कधी होऊन बसे मी
चित्रच वा होऊन हसे मी !
स्वप्न उद्याचे अंतरात तरी
काळाच्या पोटात घुसे मी !

सावली हेच सर्वस्व !




खूप उजेडात दिसत नाही काहीच
आणि फसायला मात्र होतं ..
जसं खूप अंधारातही होतं..

चित्रातला उजेड रेषेला सापडतोच असं नाही
उलट
उजेडात रेषा दिसायची बंदच होते !

जिथे रेषा नाही
तिथेच सुरू होतं ,
मनाचं राज्य !!

सावलीचा आधार घेत घेत
गवसतं एकेक चित्र ...

Friday, April 2, 2010

कमळ





मी लहानपणी कमळाचं चित्र काढत असे .
कमळाचं फूल मात्र मी तेंव्हा बघितलेलंच नव्हतं .
मला खूप वाटायचं बघावसं .. . .
त्याला कारणं खूपच होती .

चित्रातली गोष्ट खरंच कशी आहे ही उत्सुकता .
मी काढतो ते चित्र बरोबर आहे हे तेंव्हाच कळणार होतं .
क , क, कमळातला ही तर सुरुवातच होती शाळेची .
आपल्या देशाचं ‘राष्ट्रीय फूल ’ आहे ते .
आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ,
माझ्या आईचं नाव आहे ‘कमल ’ !
(लंपनला जसं दुर्गा रागाविषयी वाटायचं तसंच असावं ते .)

कोकणात आल्यावर खूप प्रकारची फुलं बघता आली .
खरी ,खरी !
खोटी वाटतील अशीही ,पण खरी !

कमळाचं सरळ वर येणं ,
उमलणं म्हणजे काय हे जणू
सर्वांना समजावून सांगणं ,
पाण्यात पाय बुड्वून उभं राहणं ..
अतिशय वेगळं आहे सगळं !

तो चेहेरा , त्या रेषा ...





आक्का नाही आता .
कधी कधी सहजच काढलेली तिची चित्रं माझ्याजवळ आहेत .
त्या चित्रांकडे मी पुन्हा पुन्हा बघतो .आक्काशी बोलल्यासारखं वाटतं .
कागद ,रेषा ,चित्रं ..एक आठवण ..एवढंच !
माणूस असतो म्हणजे काय ?
... आणि नसतो म्हणजे काय ????

शेवटच्या काही वर्षात मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांना
नवं भिंग बसवूनही
आक्काला स्पष्ट दिसत नव्हतं सगळं .
प्रयत्‍न करून करून
ती बघायची मात्र .

मी सुध्दा
आता किती आठवून बघतो
तो चेहेरा ,त्या रेषा ..
माझ्या स्मृतीचं भिंग
मोतीबिंदू झाल्यासारखं ...

Thursday, April 1, 2010

पुन्हा..




आज आभाळात पुन्हा
नाही ढग एवढासा ,
माती व्याकुळली मनी
पुन्हा कोरडा उसासा ...

Wednesday, March 31, 2010

How long to sit like this ?



It was the day I tried out my new colour pencils . My wife was reading some book . She had rejected my idea of me doing her portrait that time as the book was more interesting .But after requesting for some more time she did agree .
It really was time taking task to have something satisfactory on paper with those thin tips .But I was enjoying the picture .

Those two small vertical lines near both eyebrows are asking me ,"How long to sit like this ?"

Followers