Tuesday, June 22, 2010

अंघोळ म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे अंघोळ !





पाणी दिसताच तरुला कधी एकदा
तिथे पोहोचतोय असं होतं .
अंघोळ हा अगदी आवडीचा प्रकार .
पाण्याशी खेळत बसणं ,
बदकाला ,बॉलला अंघोळ घालत बसणं ,
त्याला अतिशय आवडतं .

पाणी उडवायला ,
पाण्याची धार बघत रहायला
त्याला वेळ पुरत नाही .

यंदा पहिल्यांदाच
पाऊस बघतोय तरू .
किती मन लावून बघतोय .
खिडकीवर हनुवटी टेकवून
बघतच बसतो .
एकटक ..

काय वाटत असेल त्याला ?
एवढं पाणी !
कोण ओततंय वरनं ?

सहज जाता जाता ..



शांतपणे चित्र काढत बसताच येत नाही .

वेळ मिळताच एखादं रेखाचित्र काढतोय .

रंगांमध्ये डुंबायचं राहून गेलंय कधीचं .

......................

रेषेबरोबरचा प्रवास सुंदरच आहे .
रेषा बघता बघता नवं गाव वसवते .

रेषा खेळत असते आट्या पाट्या ..
प्रत्येक वेळी लोण पोहचतंच असं नाही .

एक रेषा चुकली तरी
बाद होतो मी .

पुन्हा राज्य घेतो मी !

Wednesday, June 16, 2010

कब्बू




माणसांच्या गर्दीतही स्वत:चा एकांत टिकवून ,
मिळालेल्या इवल्याशा अवकाशात बिनतक्रार राहणारा ,
अतिशय सुंदर पक्षी , कबूतर !
शांतीदूत !
खरंच ,
मनाच्या शांततेला कबूतरांच्या हालचालींमुळे बाधा तर येत नाहीच,
उलट त्यांच्या त्या गिरक्यांनी सुंदर सजावट केली जाते .
तरूची नजर सारखी फिरत असते कबुतरांबरोबर .
न्याहाळत असतो त्यांना तो .
मन भरून .
त्यांच्या हवेतल्या झेपा ,बसणं ,उठणं ,मान वळवून बघणं ...
किती आनंदाने बघतो तरू !
कब्बू , कावू ,चिऊ..सगळी करमणूकच !!

विश्वनिरिक्षणाची सुरूवात करून देणारे हे क्षण ..
नाविन्याचे ,आश्चर्याचे ,आनंदाचे !
कदाचित नंतर विसरायला होतील .
आणि म्हणूनच लिहायला हवेत .
हवेत विरण्याआधीच जपायला हवेत !!

Monday, June 14, 2010

भुर्रर्र ss


तरूच्या गोष्टी सांगताना एकेक गंमत आठवते .
त्या गंमतीबरोबरच तरू डोळ्यापुढे दिसायला लागतो .
मोटरसायकलवर स्वार झाल्याप्रमाणे तो हात पुढे घेवून ‘भुर्र’ करतो .
तो आवाज तसाच सुरू ठेवून एक वेगळंच वातावरण तयार करतो तो !
नाटक करतो तो !!
अजून नीट उभंही राहता येत नसताना
त्याची ही कल्पना भारीच वाटून जाते .
कबुतरांना उडताना बघून
तो सुद्धा हात हलवून उडण्याचा प्रयत्‍न करतो ,
तेंव्हा खूपच करमणूक होते खरी .
काय सांगावं ,तसा शोध लागेलही काही काळात !

Saturday, June 12, 2010

विचारवंत तरू





तरूचे कान महात्मा गांधीजींच्या कानांसारखे दिसतात .
टवकारल्यासारखे ते आहेतच आणि थोडे मोठे देखील आहेत .
पालथी मांडी घालून तो बसतो खूपदा .
मग मात्र पाठमोरा तरू सभेसमोर व्यासपीठावर बसलेल्या
महात्माजींची आठवण करून देतो .

हाताची घडी घालून ,
एक हात ओठांशी खेळवत
शांतपणे तो कसला एवढा विचार करतो ?

अशा वेळी मला त्याला विचलीत करावंसं नाही वाटत .
ती त्याची विचारमग्न स्थिती मला खूप आवडते .
रोज रोज असा विचार करूनच तो होईल ..
विचारवंत !

आंsssबा ss !






तरू अतिशय आवडीने खातो फळं .
झेपावतोच तो फळांवर .
आंब्याच्या प्रेमात पडला आणि
सकाळचं आभाळ आणि तरूचे गाल
एकाच वेळी रंगू लागले !
every morning was a `mango morning then !!
आता आंबे संपत आले .
पण तरूला दिसतात ते सगळीकडे ..
नारळाच्या झाडावर दिसणार्‍या
नारळांना बघून तो ओरडतो , "आंssबाss !! "

Tuesday, June 8, 2010

गप्पा मारणारं खेळणं




वर्तमानपत्राचे कागद आनंदात टरकावणं हा मुलांचा खेळ बघून
थोडंसं घाबरतोच आपण .
तरूचा तो उद्योग बघून आम्ही तसे बिथरलो होतो .

पण नंतरचं त्याचं पुस्तक-प्रेम हे एक मोठं नवलच आहे !
सहा महिन्यांचा असल्यापासून तो पुस्तकं ‘वाचतोय’!
हो ,खरंच .
आणि अगदी आपल्यापेक्षा जास्त एकाग्रतेने .

बोटांनी बंद पुस्तकाची पानं तो किती सहज चाळतो !
एक एक पान पलटत त्याची नजर छानच फिरते .
चित्रलिपीचा मोठा अभ्यासक वाटतो तो अशा वेळी .
त्याला खिळवून ठेवणारं पुस्तक ग्रेटच आहे !!
आवाज न करताही ‘गप्पा मारणारं ’खेळणं .

Monday, June 7, 2010

माssमाss





तरूला चंद्राची ओळख करून दिली गेली
आणि एक नवाच अध्याय सुरू झाला .
नवा मित्र मिळाला त्याला .
‘चांदोमामा ’ला अभाळातून शोधून
त्याच्याकडे बघत बसायचं ,
त्याला लाडानं हाका मारीत
हसत सुटायचं ,हा छंदच जडला !

Sunday, June 6, 2010

बॉ ssss(ल )




बॉल या शब्दाचा
तरूसारखा नाssजुक उच्चार
आणखी कुणाला करता येईल
असं मला वाटत नाही .

फुलांचं वजन जसं जाणवतच नाही
फक्त गंध मोहीत करतो
तसं तरूचं बोलणं !
ऐकू येतं ,
मनावर अलगद मोरपीस फिरतं
पण
ध्वनीचा धक्का बसत नाही !!

आणखी एक गंमत म्हणजे
प्रत्येक लहान मोठ्या वर्तुळात
त्याला बॉलच दिसतो !
आणि त्या प्रत्येक वर्तुळाला
तो तेवढीच नाजुकशी हाक मारतो !!

हंबा ssss


तरू ,माझा शानुला नातू आता एक वर्षाचा होतोय .
त्याला खूपच आवडतंय गुरं बघायला .
बैल ,गाय ,म्हैस वगैरे आहेच ,
पण शेळी ,कोंबड्या ,कुत्रे बघून तो चक्क चेकाळतोच .
बैलाच्या हंबरण्याचा तर तो इतका डिट्टो आवाज करतो,
खरंच कळत नाही ,
त्याला हे कसं जमतं ?

आता काही दिवस त्याला आवडतं म्हणून
त्याला कडेवर घेवून मी बैलांना बघायला म्हणून
मुद्दाम घराबाहेर पडत होतो .
बैलांना न्याहाळत होतो .
त्यांचं सौंदर्य मी मनात जपत असताना
तरू त्यांना मोठ मोठ्यानं
हाका मारीत असायचा,
" हंबा sssss !!

Followers